Saturday 5 December 2015

Katha - 1



‘दर्शन’

- अभय आनंद साळवी

         

      
       सोलापूर शहराच्या जवळंच आमचं (म्हणजे माझं नाही काही..माझ्या घरातल्यांचं) ‘कुल’दैवत आहे. ते एखाद्या कुल ठिकाणी असायला हवं होतं, असं मला लहानपणापासून वाटे. कारण दरवर्षी तिथे जाण्याचा कार्यक्रम आखला जात असे. आणि त्या रखरखीत आणि मचूळ पाण्याच्या प्रदेशात एक अख्खा दिवस राहू लागे. एक अख्खा दिवस म्हणजे गम्मत नाही काही. आहो आमचे अप्पा धार्मिक, देवभोळे वगैरे असले तरीही तितकेच नितीबितीच्या बाबतीतही अगदी ठाम आहेत. विआयपी लाईन वगैरे चोचले त्यांना खपत नाहीत. म्हणे दर्शन घ्यावं ते सर्व सामन्यांच्या रांगेतूनच. म्हणायला अप्पा मुंबईत तशे फार महत्त्वाचे वगैरे आहेत, पण त्याचा फायदा कुठे करून घेतात ? असो. तर मुद्दा हा कि २ कधीकधी ३-४ तास दर्शनाच्या रांगेत आम्ही सहकुटुंब उभे राहतो. त्या रखरखीत उन्हात (छप्पर वगैरे असली तरी पण ओ) मरणाची तहान लागते. पण अडचण अशी कि भरपूरसं पाणी पिऊनही चालत नाही. अहो म्हणजे मृत्यूप्रमाणे एकदा माणूस या असल्या रांगेत गेला कि मग देवाला भेटल्याशिवाय त्याची सुटका नाही. मुद्दा असा कि लगवी वगैरे जायला सोय नसते रांगेत. त्या रांगांमध्ये एकामागोमाग एक माणूस उभा असतो. बाजूने साईड वगैरे मांगून जाण्यासाठी जागाच नसते.
       
       या सगळ्यामुळे माझी कटकट दिवसभर आईला सहन करावी लागे. तिला चिडवण्यासाठी एखाद्या पुजाऱ्याला “काय हो..अभिषेकची लाईन हि आहे ना..मग अमिताभची कुठली?” वगैरे प्रश्न मी विचारत असे. अख्खा दिवस असा गेला तरी संध्याकाळचे काही क्षण माझे फार चांगले जाई. रात्री १०:३० ची ट्रेन असते, त्याआधी काही तास एका शांत ठिकाणी आम्ही घालवायचो. हे ठिकाण म्हणजे सोलापूरचं सिद्धेश्वर तलाव. दिवसभर अनेक रांगा लावून थकलेले लोक इथे शांत बसलेले, निजलेले दिसायचे. जागा ऐसपैस असल्याने लहान मुलं बागडत वगैरे असायची. तलावाच्या पाण्यात एक वेगळीच झालर मला दिसायची. दिवसभराच्या कर्मकांडामुळे तलावाचं पाणी अर्थात चांगलं नसणार. हि झालर कदाचित त्या सगळ्याचीच असावी. तरीही ति सुंदर दिसे. तलावाचे मूळ सुंदर असण्याचे गुण कदाचित त्या कर्मकांडावर हावी होत असतील. त्या तलावाची आत्मा असावी, तिला काही कर्मकांड स्पर्श करू शकले नसावे. असो.

        तर या वर्षीही हे सगळं पुन्हा घडणार होतं. बदल होता तो हा कि यंदा २ दिवसाचा प्लॅन होता. कुलदैवतासोबत पडोसी राष्ट्रातल्या एका दैवताचे दर्शन हि घेणे होते. कर्नाटकात एक जालीम देवस्थान आहे त्याचे. जालीम अश्यासाठी कि तिथे जाण्याआधी तिथल्या अनेक भयानक गोष्टी मी ऐकत होतो. पालखी वगैरे लोकांच्या अंगावरून धावत न्हेतात. अगदी बायका मुलं सगळे पालखी न्हेतात त्या रस्त्यात हसतमुखाने आडवे होतात. मी म्हटलं ते पालखी न्हेणारे कुंग फु वगैरे शिकले असतील. ते वजन हवेत वगैरे टाकण्याची टेक्निक आहे ना काही. आई जरा जास्त चिडली तेव्हा. स्वतः सगळं बघितलंय म्हणे तिने. आणि म्हणे आरतीच्या वेळी तर अनेकांच्या अंगात काही तरी येतं. भरभर ते मंदिरातल्या कळसावर चढू लागतात. देवाशी भांडतात वगैरे. यात म्हाताऱ्या बायका अधिक. मी आईला म्हटलं आई आपण थोडे वर्ष थांबूया. तो पर्यंत तू हि म्हातारी होशीलच ना. तेव्हा जाण्यात अर्थ आहे. त्या दिवशी आईने भातावर आमटी केली नाही. भाजीच घ्यावी लागली. असो.  

       ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्या दिवसाच्या सकाळी सोलापुरात दाखल झालो. दरवर्षी तिथून आम्ही थेट त्या मंदिराच्या जवळ अप्पांच्या ओळखीच्या पुजार्याच्या घरी जात असू. सकाळच्या सगळ्या भानगडी उरकायला. फॅंड्री सिनेमा बघितल्या पासून मला तो परिसर किळसवाणा वाटे. त्या पुजार्यांची मुलं वगैरे गावात त्या रुबाबात वगैरे फिरत असावीत असं मला वाटे. ते गाव देखील अगदी त्या पिच्चर मधल्या गावाप्रमाणे. सगळीकडे किळसवाणी घाण, गटार आणि डुक्कर. मुंबईतही घाण असते ओ. पण ति वेगळी, घाण असली तरी ति कुठली घाण आहे यावर तिचं किळसवाणेपण ठरतं. या सगळ्या गोष्टी मी जरा स्पष्टंच अप्पांना सांगितल्या. तेव्हा आम्ही सोलापूरात एका लॉजमध्ये उतरलो. गम्मत अशी कि ज्या माणसाच्या गाडीने आम्ही दरवर्षी सोलापूर ते मंदिर आणि नंतर मंदिर ते सोलापूर हा प्रवास करत असू. हि लॉज त्याचीच. वारकरी वगैरे वाटावा असा तो माणूस. त्याच्या बोलण्यात सोलापुरात दुर्मिळ असणारा गोडवा. अप्पांना सोडाच तो मला देखील साहेब म्हणत होता.

       त्याचा नेहमीचा ड्रायव्हर हि होताच. हा ड्रायव्हर कधीच काही बोलल्याचं मला स्मरत नाही. एकदा सोलापुरातल्या एसटीने थोडी धडक वगैरे दिली तेव्हा त्या एसटी चालकाच्या आई वडिलांची विचारपूस याने अस्सल सोलापुरी भाषेत, भर चौकात केली होती. हा प्रसंग वगळला तर तो नेहमी तसा शांत असे. पण घरातल्या मुलांकडे पाहून वगैरे प्रसन्न हसायचा. तो खडूस वगैरे असा कधीच वाटला नव्हता. सहसा शांत ड्रायव्हर (या विषयात तसा अनुभव आहे) बराचसा खडूस असतो. आणि प्रसन्न हसणारा ड्रायव्हर खूप सारी वटवट करत असतो. या सगळ्याचं इतकं तपशील देण्याचं कारण म्हणजे आधी कुलदैवत, मग कर्नाटक असा २ दिवसाचा प्रवास या माणसा सोबत करायचा होता. २ दिवसात ४ वेळा हेच्या सोबत जेवण करायला बसायचं होतं आणि चहा वगैरे आलाच. ड्रायव्हरला नोकराप्रमाणे वागवण्याचे संस्कार अप्पांनी केले नव्हते. मुळात ‘नोकर’ हा शब्द शिवी असल्याप्रमाणे का वाटतो. कुणास ठाऊक. असो.

       सकाळी ११ वाजता मंदिरात पोहोचलो. इतकी गर्दी पाहून मी पुरता चक्रावून गेलो. अप्पा देखील थोडे थबकलेच. अश्यावेळी परिवारातल्या बायका फार खंबीर होतात. आई, आत्या, बहिण वगैरे फार उत्साहात होत्या. अश्या खास मौक्यांसाठी अश्या मोठ्या देव्स्थानांमध्ये एक खास इमारत असते. या इमारतीत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त रांगा मावतील अशी योजना केली असते. या इमारतीत प्रत्येक माळ्यावर लगवी वगैरेची सोय हि आहे हे मला कळलं. मंदिराच्या आत कशे बशे घुसलो. तेव्हा मात्र लोकल पकडल्यासारखंच वाटलं. आतला गोंधळ भयंकर होता. कुणी प्रदक्षिणा घालणारं मध्येच आपल्या पायाजवळ लोटांगण वगैरे घाले. कुणी बोकड आत आणल्यामुळे गार्ड लोकांची बोलणी खात असे. कुणीतरी कुठल्याश्या प्राण्याचा शिंग कि काय पेटवून फुंकत वगैरे असे. आत देवीला साडी देण्यासाठी खास दुकान वगैरे हि होतं. त्याची पण ओरडा ओरड. मला गोंगाटाचा त्रास होतो. साधा लोकलचा हॉर्न वाजला तरी मी दोन्ही कानात बोटं कोंबतो. विसर्जनच्या मिरवणुकीत वगैरे मी कधी नाचलो नाही. नितीबिती नाही कसली, फक्त गोंगाट सहन होत नाही म्हणून. दर्शनाच्या रांगेत आम्ही सामील झालो. ति रांग आता त्या खास इमारतीत शिरणार होती. इमारतीत शिरल्या शिरल्याच, मला फार विचित्र वाटलं. श्वास वगैरे घुस्मटल्यासारखं, आणि मला दमाबिमा काही नाही. आई थोडी पुढे होती. मी आत्याला म्हणालो, “झक मारा तिथे..मी बाहेर थांबतो”. आत्या, “असं म्हणत नाही बाळा, बरं थांब बाहेर, गाडीत जाऊन बस हवं तर” वगैरे म्हणाली.

       मंदिराच्या एका बाजूला प्रेक्षकगृह होतं. म्हणजे स्टेडियमला पायऱ्या वगैरे असतात तसं काही. दर्शन वगैरे झालं कि निवांत असलेली मंडळी इथे बसत. आज तिथे सगळे बसलेले ते बहुतांश सोलापूर वगैरे शहराजवळच्या कॉलेजातले ग्रुप वगैरे. एक ग्रुप एकाच रंगाचे टीशर्ट घालून आलेला. कसला तरी त्यांना माज वगैरे आहे, असं त्या टीशर्ट वर लिहलेलं. ते सगळे ग्रुप सेल्फी वगैरे काढत होते. काही नवविवाहितांचे लाजणे-रुसणे वगैरे हि तिथे चालू होते. मी कसा बसा गर्दीतून वाट काढत तिथे पोहोचलो. सावली पाहून एका कोपऱ्यात बसलो. तिथून मंदिराची सगळी भागदौड दिसत होती. थोडा गोंगाट मात्र कमी ऐकू येई. इथे प्रचंड गर्दी असली तरी यांचं अॅडमिनिष्ट्रेशन भलतंच होतं. मुख दर्शन, धर्म दर्शन, अभिषेक, गोंधळ (म्हणजे धार्मिक गोंधळ असतो एक) या सगळ्यासाठी वेगळ्या रांगा-डिपार्टमेंट वगैरे होते. सोबत बिजीला कुठूनसा वाजणारा ढोल वगैरे हि होता. अनेक पालक वगैरे त्यांच्या पोरांना शोधतानाही दिसत होते. गर्दी खूप झाली म्हणून एका गार्डने मध्येच बॅरिकेड वगैरे घातलं. “तिकडून मागून बि हाय बाहेर जायला” असं तो ओरडून सांगत. त्या गार्डने जरा मान वळवली कि काही हौशी माणसं (खास करून बायका) बॅरिकेड च्या खालून कशे बशे घुसून पलीकडे जात. तेवढ्यात त्या गार्डचं लक्ष गेलं तर त्याने एका बाईच्या डोक्याला मागे दाबून बॅरिकेडच्या अलीकडे ढकललं. हौशी माणसं आता फार उत्साहात आली. काही खालून, काही बॅरिकेडच्या वरून असा त्यांनी हल्ला चढवला. दुसरा गार्ड आला त्याने पहिल्या गार्डाच्या आई वडिलांची मोठ्याने विचारपूस केली आणि तो बॅरिकेड त्याने काढून टाकला. पूर्वी इंडिया मॅच जिंकली कि सगळे प्रेक्षक मैदानात धाव घ्यायचे, तशे काहीशे हौशी माणसं धाव घेत होते.

       या धाव घेण्यात त्या हौशी माणसांची पॅशन पाहून मला पूर्वीचा एक प्रसंग आठवला. माझी एक बुटकीशी, जाडजूड काकी होती. आम्ही कुठेही फिरायला वगैरे गेलो तर काकीला आधार देण्याची जवाबदारी माझी असे. तिला गुडघ्याबिड्घ्याचा त्रास वगैरे हि होता. लहानपणी या काकीने आमचे खूप लाड केलेलेत. म्हणून तिला आधारबिधार देण्याची कटकट वगैरे वाटायची नाही. हि काकी एका विशिष्ट देवीची पूजा-उपास वगैरे करायची. त्या देवीचं होम टाऊन वाई या गावाच्या जवळ. एकेकाळी तिथे दरवर्षी खूप हौशी माणसं चेंगराचेंगरीत जात असे. तेव्हा अप्पा तिथली टूर काढायला धजावत नव्हते. काका हयात नव्हते, तेव्हा अप्पा काकीला बहिण मानत असे. बहिण म्हटली कि अप्पा तिच्यासाठी काहीही करतील. एकदा काकीने तिथे जाण्याचा जवळ जवळ हट्टंच धरला. काकीची एक मुलगी. ति लग्न होऊन सुरतला राहत असे. तिचा इथल्या भानगडींशी फारसा संबंध नाही. तेव्हा अप्पांनी मग टूर काढायचं ठरवलं. अर्थात आता सरकारने तिथे सुधारणा वगैरे केल्या आहेत याची खात्री करून.

       त्या मंदिराच्या परिसरात असंख्य गावठी बार्बिक्यू होते. जबरदस्त वास वगैरे येई. रानाबिनात असं चिकन-मटण शिजवून वगैरे खावं हि माझी एक खूप आधीपासूनची फॅण्टसी. अप्पांना मी म्हणालो, “दर्शन झाल्यावर आपण इथे राहू काही वेळ. मस्त पार्टी पण करू.” अप्पा भडकले म्हणाले हि पार्टी नाही हे सगळं बेकायदेशीर आहे. सरकारने यावर बंदी आणलीय. मला मामला आता लक्ष्यात आला. पुढे असा बिनडोकपणा मी कुठल्याच देवस्थानात केला नाही. असो. तर हे सगळं मंदिराच्या म्हणजे डोंगराच्या खाली. डोंगरावरचा रस्ता पूर्ण पार्किंगने भरलेला. तेव्हा डोंगर चढून (म्हणजे अगदी लिटरली नाही, तरी पण ओ) जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. संध्याकाळ झालेली. वाई हे गाव महाबळेश्वर-पाचगणी पासून जवळ. तेव्हा भयंकर थंडीही. काकी सर्वात सिनिअर. तेव्हा आता कसा पूर्ण होणार तिचा हट्टं. याचा विचार माझ्या, आपांच्या आणि खुद्द काकी सोडून सगळ्यांच्या डोक्यात चालू. काकी निघाली भरभर वाट काढत. एकेकाळी काकी कोकणात रानाबिनात फिरलीय, असं आई मला तेव्हा सांगत होती. काकी पुढे आणि आम्ही सारे मागे. रिटायर झाल्यावरही एखाद्या बॉक्सरमध्ये शेवटची एक फाईट शिल्लक असते, असं काहीसं म्हणतात ना. तसं काहीसं काकीच्या त्या पॅशनमध्ये मी बघत होतो. तसं काहीसं नसेलही कदाचित. पण काकीचे गुडघेबिड्घे तेव्हा अजिबात दुखलेबिखले नाहीत. आणि आधारबिधार मलाच जास्त गरजेचा होता तेव्हा. त्यानंतर वर्षभरात काकी वारली. ते वर्ष मात्र तिचं सगळं दुखणंबिखणं फार नव्हतं. ति गेली ते हि गाढ झोपेत असताना. कुठलासा दुर्मिळ येणारा अटॅक तिला आलेला, असं डॉक्टर म्हणाले.    

        प्रेक्षकगृहात बसून आता जवळ जवळ दीड तास झालेला. मोबाईलची बॅटरी वगैरे हि संपत आली होती. दर्शन झाल्यावर त्या नेहमीच्या पुजाऱ्याकडना कसलीशी आरती वगैरे करून घेण्याची पद्धत हि होती. त्या डिपार्टमेंट जवळ मी जाऊन उभा राहिलो. १५ मिनिटं वाट बघितली. कुणीच नाही. अखेर प्रंचंड धैर्य वगैरे गोळा करून मी एक्जीटच्या दिशेने निघालो. वाटलं बाहेरची गर्दी वगैरे वेगळी असेल. एक्जीटचा महाद्वार वेगळा. तिथल्या वाटेत धार्मिक गोष्टींच्या जागे खेळणीबिळ्णी विकत होते. इतका वेळ रांगेत रडणाऱ्या मुलांचा विचार या देवस्थानाने अगदी दूरदृष्टी वगैरे लावून केलेला. काही शहाणी मुलं जि आत शांत वगैरे असतात, ति आता नव्याने रडतबिडत होती. गम्मत अशी कि पुन्हा महाद्वार बाहेरंच एक वेगळी भानगड होती. ज्या मुलांना खेळणी नाही मिळाली त्यांचं रडणं इथे आले कि थांबे, ज्यांना खेळणी मिळालीयेत त्यांचा उत्साह सुद्धा इथे आले कि बंद होई. हि भानगड म्हणजे, काही तो/ति (इथून पुढे सोयीसाठी आपण त्यांना ‘ते’ म्हणूया) माणसे इथे भिक (असं म्हटलं तर चालतं ना ?) वगैरे मांगत होते. आणि सोबत गावातल्या म्हाताऱ्या आज्या ज्या प्रकारे लाड वगैरे करायच्या तसंपण काही करत होते. ते मात्र मोठ्या बाप्यांशी. लहानग्यांना त्यांच्या जवळ कोण जाऊ देईल. आता हे सगळं तटस्थ वगैरे होऊन बघत असलो तरी, लहानपणी मी त्यांना बघून चड्डीत हगाय्चो. आई एकदा म्हणाली होती, “कश्याला घाबरतोस इतका त्यांना. अरे माणसंच ना ति. त्यांना हि जीव आहेच ना. देवाने असं बनवलंय, त्यात त्यांचा काय दोष.” आईचा ते बोलणं मला विचारात टाकायचं. असो.

        तर मुद्दा हा कि त्या देवस्थानात आत जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्या वरना मला अजून एका देवस्थानाची टूर आठवली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हून जवळ असलेला गरिबांचा गोवा आहे ना (तो चीक्कीवाला) तसंच त्याजवळ एक देवस्थान हि आहे, मुंबईतले खरे भूमिपुत्र तिथे फार जातात. तिथे मात्र ‘ते’ खूप दिसतात. त्यांना ते मंदिर अलॉट केले असावे. त्यातले काही नॉर्मल पुरुषही वाटतात. अनेक ‘ते’ मंडळींच्या अंगात कोणीतरी संचारते. मी कोकणातला असल्यामुळे मला हे नवीन नाही, पण हे संचारणं वेगळं असायचं. हे संचारणं खास ‘तें’च्यासाठी कस्टम मेड वाटायचं. तपशिलात जाता येईल, पण ते सोयीचं नाही. तर गम्मत अशी कि अंगात आलेले ते किव्वा एखादी स्त्रीसुद्धा लाईनबिन पाळत नसे. साईडने जाण्यासाठी इथे पुरेशी जागा होती. आधी एक पुरुष भयंकर त्रासिक चेहरा घेऊन किव्वा रडवेला होऊन साईड मांगयचा. त्या मागून संचारलेले आणि मागून इत्तर घरातले किव्वा पंथातले. काही चतुर भक्त त्यांच्या भरभर साईडने जाण्यामध्ये सामील व्हायचे. ति सगळी मंडळी नंतर ढोलाच्या तालावर नाचताना वगैरे दिसतात. अप्पा नितीबितीला धरून असले तरी ते स्वतः पुरते. तेव्हा, अप्पा या भानगडीत पडले नाहीत.

       आता जवळ जवळ ३ तास उलटून गेलेले. अप्पा बरोबर असतात तेव्हा मी कधीच किश्यात चिल्लरसुद्धा ठेवल्याचं आठवत नाही. तेव्हा हि किसा रिकामा. गाडीत जाऊन बसलो तर मी ऊगाच त्या ड्रायव्हरला काय वाटेल याची चिंता करत होतो. बरं मरू दे जाऊ म्हटलं नि बघायला गेलो तर गाडी कुठेच दिसे ना. ते ओळखीच्या पुजाऱ्या घरी गाडी लावली असणार, नेहमीप्रमाणे हे लक्ष्यात आलं. तिथे दुपारचं जेवण ठरलेलं. आता तिथले आजोबा खूप डोकं खातात, तिथे एकट्याने कोण जाणार. मागे हात वगैरे बघून म्हणाले होते, प्रामाणिक आहे पण आळशीपणा नडतो, म्हणून यश नाही. असो. तर, घसा सुकलेला, भर उनात पायात चपला नाहीत (चपला स्टॅंन्डमध्ये ठेवलेल्या..पण त्याचा बिल्ला अप्पांकडे), किसा रिकामा. आणि यावर कळस म्हणजे सगळे भिकारी सारखे जवळ येऊन उभे राहत. मनात वाटे, या क्षणाला त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. नंतर वाटे फक्त याच क्षणाला कश्याला. असो. तर मुद्दा हा कि आता वयताग आलेला, लहानपणी हरवलेली (काही क्षणासाठी) मुलं जशी आता इथेच कसं आपण दिवस काढणार याचा विचार करतात. तसं मनात येई. हे सगळं भलतंच वाटे. एक्जीटच्या महाद्वारातून येणाऱ्या गर्दीत स्वतःची माणसं शोधू लागलो. लागलेली भूक, तहान, उन या सगळ्यामुळे प्रत्येक बाई आईसारखी वाटे. पुन्हा वाटलं जावं पुजार्यांकडे. पण हाच तो परीक्षेचा काळ असावा. देव परीक्षा वगैरे घेतो ति हीच असावी. म्हणून किल्ला लढवून होतो. अखेर माझी माणसं दिसली. सगळ्या संतापाचा आता स्फोट होणं अपेक्षित होतं. पण तसं काहीच झालं नाही. पाण्याची एक अक्खी बाटली एका घोटात रिकामी केली. आणि कदाचित त्याने माणसात आलो (आत्याच्या मते). अप्पा-आई फार काही बोलले नाहीत. ते हि थकलेलेच. पुजाऱ्याकडेच जेवण करणे होते. एरवी त्यांच्या जेवणाला नावं ठेवणारा “पुरण पोळी बरोबर कुणी दुध घेतं का..” म्हणणारा मी आज चव वगैरे विसरून पोटासाठी हादडत होतो. तर तो दिवस संपला. सोलापुरात आलो तेव्हा ८ वाजले होते. गप रूमवर झोपी गेलो.

       दुसरा दिवस उजाडला. सकाळी सातला इडली-वडाचा नाष्टा करून सीमोल्लंघन करायचे ठरले. गाडीत मागे बसलेलो, निवांत ३-४ तासांचा प्रवास होता. हल्लीच डाउनलोड केलेली एक फिल्म बघण्याचा हा योग होता. पण ते काही जमलं नाही. रस्त्याची लागलेली विल्लेवाट भयंकर होती. सतत उडूनबिडून पुन्हा वयताग येत होता. “या पेक्षा आमचं कोकण बरं..” हे जवळ जवळ प्रत्येकाने एकदा बोलून घेतलं. ३-४ तासाच्या प्रवासाला रस्त्यामुळे तब्बल साडेपाच तास लागले. मंदिराच्या आधी तिथे एका नदीत जाणायची प्रथा असे. आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतना बाहेर उतरताच एक भयंकर पाटी बघितली. “कपडे काढून, डब्यात टाकावे.” (हुकुमावरून). खरंच देवस्थान जालीम निघालं. घरातल्या बाकी मोठ्यांना ति पाटी दाखवली तर ते काहीच म्हणाले नाहीत. मी म्हटलं, “त्यांचा नियम असेल..आत सोडणार नाहीत.” आई-आत्या हसायला लागल्या. नंतर कळलं, तिथे नदीच्या काठावर कपडे टाकून जाण्याची परंपरा आहे. लोकं आपले कपडे तिथे टाकून दुसरे बरोबर आणलेले कपडे घालून जातात. तेव्हा लोकांनी ते कपडे नदीच्या काठावर न टाकता त्या डब्यात टाकावे असा हुकुम होता. तरीही पाटी काही बरोबर नव्हतीच. म्हटलं आपलं राष्ट्र नाही, तेव्हा चालवून घ्यावं.

       आईच्या मते मंदिरात फार बदल घडलेला. आधी मंदिर उघडं असे. कळस वगैरे दुरून दिसायचे. हौशी लोकं ते बघताबघता चढायचे. आता काळ बदलला तेव्हा मंदिराला वरतून झाकण लावण्यात आलं. एस्थॅटिकली सुद्धा ते काही अर्थपूर्ण वाटत नव्हतं. तर रांगेत आम्ही शामिल झालो. इथे रांग मोठी असली तरी गिचमिड नव्हती, विचित्र वाटत नव्हतं. तेव्हा मी एकटा थांबण्याचा अति शहाणपणा वगैरे केला नाही. ऐकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात काही दिसत नव्हत्या. एका सह-भक्ताच्या मते, “त्याची एक विशिष्ट अशी वेळ असते, ति फक्त त्या दोघांना माहित त्या देहाला आणि त्या परमेश्वाराला..”, अप्पांनी मान डोलावली. तर गम्मत म्हणजे तासाभरात सगळं आटपलं. बाहेर एका हॉटेलात जेवायला बसलो. अप्पा ड्रायव्हरला फोन करत होते. तो काय लागेच ना. जेवण समोर आलं, इथेही डाल तडका-तंदूर रोटी वगैरे संस्कृती पाहून अगदी मुंबई सारखे वाटले. असो. मुद्दा हा कि ड्रायव्हर सापडत नव्हता. अप्पांनी माझ्याकडे अपेक्षेने बघितलं. त्यांनी रोटीचा तुकडा अजून तोडला नव्हता. माझी दुसरी रोटी चालू होती. अखेर ते उटले ‘एकदा बघून येतो..’ म्हणून गेले ते आमचं जेवण झाल्यावर आले. अर्थात त्यांच्या रोट्या वगैरे आम्ही संपवल्या. नाहीतर त्या ऊगाच चिवट वगैरे होतात. अप्पांना गाडी, ड्रायव्हर काहीच सापडलं नाही. काल मला सापडत नव्हते. मी म्हटलं अप्पांना, “तुम्ही जेवून घ्या, मी बघून येतो.”

        म्हटलं कसला वयताग आहे. पूर्ण पार्किंग पिंजून काढली. पोट भरल्या भरल्या भर उनात कोण हिंडेल. हा ड्रायव्हर पण नालायक. कुठेच ठिकाणा नाही गाडीचा (आणि त्याचा). पुन्हा परत हॉटेलमध्ये आलो. अप्पांच्या रोट्या खाऊन झाल्या होत्या. जीरा राईसची वाट बघत होते. थोडा वेळ होऊन गेला. तर तेवढ्यात ते दोघंही (जीरा राईस आणि ड्रायव्हर) आले. अप्पांनी मी नसताना (त्यामुळे त्याचा तपशील कुठून देऊ) गाडी मालकाला फोन लावला होता. (आईने सांगितलं) आम्ही अमुक अमुक हॉटेलात जेवायला बसलोय, तुमचा फोन जर ड्रायव्हरला लागला तर त्यांना इथे पाठवून द्या. निव्वळ हि माहिती त्या ड्रायव्हर पर्यंत पोहोचावी इतकाच अप्पांचा उद्देश (कदाचित) होता. मुद्द्याकडे नंतर येऊ. ड्रायव्हर आला जेवला, आम्ही निघालो. या सगळ्या भानगडीत अर्धा पाऊन तास जास्त गेले, एवढंच.  

        परत सोलापुरात आलो तेव्हा रात्रीचे ९ वाजले. रात्री १०:३० ची गाडी. जेवण , बाथरूम, इत्यादी उरकायला फक्त तास भर (अप्पांच्या मते स्टेशनवर निदान अर्धा तास आधी जावं). या सगळ्या गणितात, माझ्या तलावाचं समीकरण बसे ना. असो. पुन्हा येऊच. विशेष नाही. तर आता मुद्द्याकडे येतो. आम्ही ९ वाजता आलो ते सरळ सुगरणमध्ये (सवयीने) शिरलो. सुगरण प्रकरण एक भलतंच (सोलापूरकरांना ठाऊक). मात्र अप्पा, ड्रायव्हर, गाडी मालक आणि त्याचा (त्यांचा) मुलगा खूप काही चर्चा करत होते. काही वेळाने अप्पा आत आले.

        “श्या..नाही हे घडलं ते बरं नाही. असं व्हायला नको. मी ऊगाच फोन केला.” इत्यादी म्हणत अप्पा नाराज वाटले. (सुरुवातीपासून) घडलं असं कि, आधी अप्पांचा ड्रायव्हरला फोन लागला नाही कारण, सीमोल्लंघन केल्यामुळे ड्रायव्हरच्या नंबरवर आधी शून्य दाबावा लागतो. हे ड्रायव्हरने आम्हाला प्रवासात येताना सांगितलं होतं. अप्पा म्हाणाले होते, “असू दे. असू दे. हरकत नाही. आता सोडा ओ ते.” मात्र गाडी मालकाने ते सोडलं नाही. हा वारकरी वगैरे वाटणारा माणूस. भयंकर जास्त कस्टमर प्रधान होता. त्याच्या ड्रायव्हरने आमचा घालवलेला वेळ त्याला खपला नाही. अप्पांदेखत तो ड्रायव्हरला, “ते काहीही असो, तुम्ही आता दुसरी गाडी बघा, इथली नोकरी संपली तुमची.” वगैरे म्हणाला. अप्पा सांगत होते काहीच फारसं घडलं नाहीये, तुम्ही ऊगाच गैरसमज करताय. कृपा करून हा विषय इथे संपवा, वगैरे. तो ड्रायव्हर मान खाली घालून उभा.

       अप्पा हे सांगत होते, तेव्हा मी आईला म्हणालो, “तो मालक आहे, तो काहीही करू शकतो, म्हणून माणसाने नोकरी करू नये.” याचा तपशील असा कि मी नोकरी वगैरे करणार नाही, असं आईला नेहमी सांगतो. दुसऱ्यासाठी काम करणं मला पटत नाही. अप्पा अर्थात खवळले. माणसाची किंमत कशी घसरत चाललीय यावर एक व्याख्यान वगैरे सुरु झालं. तेवढ्यात गाडी मालक आत आले.

       “माफ करा साहेब. यांना हीच भाषा कळते. मी काही खरोखर त्याला नोकरीहून काढणार नाहीये. अधूनमधून मालक कोण आहे हे नोकराला कळायलं हवं. त्याचा करता धरता मी आहे. मी नसतो तर तोच नसता हे त्याला कळायला हवं. निमूट मान खाली घालणं हे त्याला बंधनकारक आहे. अखेर मला त्याची काळजी सुद्धा आहेच. हे आमचं रोजचंच आहे, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ.” बाकीचं ठाऊक नाही पण अप्पांना त्याची नोकरी नाही गेली याचं समाधान वाटलं. आम्ही शांतपणे निघालो. पुन्हा पुढल्यावर्षी पर्यंत मालकाशी आमची भेट आता नाही.